गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे, काही ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) देखील पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. तर ,जायकवाडीत 36.35 टक्के पाणीसाठा आहे.
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस
नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी येलो अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला आहे.
गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असून, धरणातून 3 हजार 408 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात जात आहे. त्यातच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दोन दिवसांपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध जलसाठा
गंगापूर - 97 टक्के
कश्यपी - 89 टक्के
पालखेड - 97 टक्के
दारणा - 88 टक्के
भावली - 100 टक्के
मुकणे - 89 टक्के
वाकी- 82 टक्के
भाम- 100 टक्के