Type Here to Get Search Results !

आज राज्यात किरकोळ पावसाची शक्यता, उद्यापासून महाराष्ट्रात उघडीप होण्याचा अंदाज...

राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यात मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडं अहमदनगर, नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. 

उद्यापासून पाऊस निरोप घेणार

आजही राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. तर 22 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाशसहित उघडीपीची शक्यता आहे. 

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकाबरोबरच सोयाबीन आणि कापूस हे पीक घेतले जात असते. यंदाच्या कापूस आणि सोयाबीन पीक हे दोन्ही मुसळधार पावसामुळे अत्यंत वाईट स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) बळीराजा मेटाकुटीला आला आहे. हंगामी पिके घेणारा शेतकरी वर्ग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. 

मागील महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस आल्याने सोयाबीन पिकात पाणी साचले होते. त्यामध्ये जवळपास 40 टक्के पिकाचे नुकसान झाले होते. मात्र, सोंगणीला आलेले सोयाबीनचे पीकही पाण्यात गेले आहे.  

सोयाबीन पाण्यात तर शेतकरी कोमात

हजारो हेक्टर सोयाबीन ही पाण्यात सडून गेली आहे. यंदाच्या वर्षी हंगामी पिकाचे झालेले नुकसान पाहता, खाद्यतेल आणि पशू खाद्य महाग झाल्याने दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

सोयाबीन या पिकाच्या संदर्भात हेक्टरी 80 ते 85 टक्के नुकसान झाले आहे. शेतात पीक उभे असेल तरच पंचनामे करीत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. कारण काही शेतकर्‍यांनी पिके काढली असली तरी त्यांचे नुकसान झालेले आहे. 

यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत असून दुबार पंचनामे करून मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 अनेक  भागात मुसळधार पावसाने  शेती आणि पीक पूर्णतः पाण्यात आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची झालेले पीक नुकसान पंचनामे लवकरात लवकर करून सरकारने अनुदान जमा करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.  

Tags