मुंबई, नाशिक सह विदर्भ आणि मराठवाडा यलो अलर्ट
महाराष्ट्र: हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून देखील मुंबई आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच राज्यातील पालघर, अकोला, भिवंडी पुणे या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज देखील हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक मध्ये कहर तर गोदावरी नदीला पुर
नाशिक सह मुळा, भंडारदरा धरणाच्या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळं धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळं गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर बीड या जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर, जळगाव जिल्ह्याला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातही यलो अलर्ट
दरम्यान, मुंबईत देखील पावसाची रिपरिपस सुरुच आहे. मध्यरात्री मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मात्र, या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होत आहे.
यलो अलर्ट म्हणजे काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
अकोल्यात मुसळधार पाऊस
अकोल्यात जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसाने शहरातील अनेक भागांत पाणी शिरलं आहे. या पावसामुळं अनेक रस्ते जयमय झाले आहेत. शहरातील मोठी उमरी भागात उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथे रस्त्याला अक्षरश: नदीचं रुप आलं आहे. अनेक वाहनधारकांना रस्त्यावरुन वाहने काढतांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा जिल्हा प्रशासनाचा इशारा.
पंढरपूर मध्ये शिरलं पुराचं पाणी
उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आज पंढरपूरमध्ये पोहोचला आहे. त्यामुळं चंद्रभागी नदीची पाणी पातळी वाढी आहे. पुराचे पाणी वाढू लागल्यानं व्यास नारायण झोपडपट्टी मधील नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे. सायंकाळी चंद्रभागा तीरावर असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. रात्री ही पाणी पातळी अजून वाढणार असल्याने प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली होती.