Godavari River Flood :नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या 43 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पूर आला असून कोणत्याही नागरिकांनी नदीत उतरू नये, जनावरे व इतर साहित्य घेऊन नदी काठावर जाऊ नयेत आशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam Update) तब्बल 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, गोदावरी नदीला (Godavari River) पूर आला आहे. त्यामुळे पैठणकरांची चिंता वाढली असून, रात्रीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल या चिंतेने पैठणकरांनी रात्र जागून काढली आहे.पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शहरातील 625 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले
2006 मध्ये जायकवाडी धरणातून तब्बल 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला होता. तर पैठण शहरात पाणी घुसल्याने नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यातच आता दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आल्याने, पैठणकरांना पुन्हा 2006 ची पुंनरावृती होते काय अशी परिस्थिति आहे. त्यामुळे पैठण शहरातील नदीकाठच्या नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.
शनिवारी संध्याकाळी 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर हा विसर्ग दीड लाखापर्यंत वाढवण्यात येईल अशा सूचना प्रशासन दिल्या होत्या. त्यामुळे जायकवाडी प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर स्थानिक प्रशासन रात्रभर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. जायकवाडी धरणात येणारी आवक आणि होणारा विसर्ग याची क्षणाक्षणाला नोंद घेतली जात होती.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पैठण शहरातील 625 नागरिकांचे स्थलांतरण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाले आहे.