Type Here to Get Search Results !

कापसाच्या दरात घसरण सुरूच...हे आहे कारण

Cotton News : सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्यादरात (Cotton Price) घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. दरात घसरण होत असताना देशात कापसाची आयात केली जाणार आहे. ही शेतमालाची करण्यात येणारी आयात ही आयात शुल्क (import duty) मुक्त असणार आहे. तसेच कापसाच्या दरात घसरण का झाली? याबाबतची माहिती पाहुयात...


कापसाची आयात केली जाणार 

या महिनाभरात कापसाच्या दरात  प्रतिक्विंटलमागे 500 ते 800 रुपयांची घसरण झाली आहे. दर घसरल्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी कापूस साठवूण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे कापसाची आवक मंदावल्यामुळं सूत आणि कापड उद्योजकही चिंतेत आहेत. 

अशातच केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आयात  शुल्क मुक्त असणार आहे. या आयातीत पूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. सध्या भारतीय सुताची मागणी घटली आहे. रुईची घटती मागणी तसेच सेबीने वायद बाजारावंर अघोषीत घातलेली बंदी यामुळं दरात घसरण होत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.

आयात शुल्क माफ

देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात घसरण होत असताना ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आयातीत कापसावर पूर्वीचे 11 टक्के आयात शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळं पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण होण्याची भीती अभ्यासकांनी वर्तवली आहे. यावर्षी भारतानं ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन म्हणजेत तीन लाख गाठी कापसाची आयात होणार आहे.  केंद्र सरकारनं  आयात शुल्क माफ केलं आहे. त्यामुळं दरात घसरण होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातही कापसाच्या दरात घसरण

विदर्भासह (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन (cotton Production) घेतले जाते. मात्र, सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर पाहता यावर्षीही कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात कापसाचे दर पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घटले आहेत. सध्या कापसाचा 7 हजार 200 ते 7 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.(संदर्भ-abp maza)

Tags