Type Here to Get Search Results !

मराठवाडा कोकणसह या भागात मुसळधार पाऊस

Maharashtra Rains 



 राज्याच्या विविध भागात पावसाचा (Rain) जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच मुंबई शहरासह उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update ) अंदाज भारतीय हवामान विभागाने  वर्तवला आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रांकडून परिस्थिती आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, सध्या राज्यातील विवध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

सिंधुदुर्ग पाऊस

तळकोकणात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) संततधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. या पावसामुळं सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. यामुळं 27 गावांचा संपर्क तुटला आहे. निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

औरंगाबाद मध्ये मुसळधार पाऊस

जुलै महिन्याच्या सुरवातीपासून मराठवाड्यात कोसळणारा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. औरंगाबादमध्ये सुद्धा वैजापूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार पाहायला मिळाला. वैजापूरच्या लाडगाव-कापूसवाडगाव शिवारात झालेल्या पावसाने नदी-नाले तुडंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. सोबतच शेती पाण्याखाली गेल्यानं पिकांना फटका बसला आहे.

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यायत आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Tags