Type Here to Get Search Results !

कपाशीवर घोंगावतेय गुलाबी बोंड अळीचे संकट, अशी करा अळीसाठी उपाययोजना

 Cotton : कपाशीवर घोंगावतेय गुलाबी बोंड अळीचे संकट


आज आपण या लेखात गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र आणि उपाययोजना याविषती माहिती जाणून घेणार आहोत.  (Pink Boll worm)

Pink Boll worm- गुलाबी बोंड अळी

सद्य स्थितीत कपाशीवर पोषक वातावरणामुळे गुलाबी बोंड अळीचे संकट घोंघावत आहे. सर्वसाधारण क्षेत्रात एक टक्के आढळ असला, तरी काही ठिकाणी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याने वेळीच सावध होत उपाययोजनांचे आवाहन या तज्ञांनी केले आहे.

गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी काय करावे

यंदा जून व जुलै दरम्यान तसेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पीक व्यवस्थापनात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. नेमकी हीच स्थिती कीड रोगांच्या प्रादुर्भावाची कारण ठरली आहे. 

एकीकडे अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकाची मोठी हानी केली असताना आता पावसाच्या उघडिपीच्या काळात कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून आला आहे.  सध्या प्रादुर्भाव १ टक्क्यापर्यंत दिसत असला, तरी काही ठिकाणी तज्ञांच्या पाहणीत या प्रादुर्भावाने गाठलेली वा ओलांडलेली आर्थिक नुकसानीची पातळी धोक्याची घंटा मानली जाते आहे.

गुलाबी बोंड अळी नुकसानपातळी अशी मोजतात...

फुलं आणि पाते अवस्थेत असलेल्या कपाशीमध्ये लावलेल्या कामगंध सापळ्यात सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळून आल्यास, प्रति दहा फुलांपैकी एकात अळी सापडल्यास किंवा १० टक्के डोमकळ्या आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे समजतात. दुसरीकडे बोंड लागल्यानंतर दहा बोंडा पैकी एकातही अळी आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे मानले जाते.

 गुलाबी बोंड अळी जीवनचक्र

सद्यःस्थितीत गुलाबी बोंड अळीचे पतंग सक्रिय झाले आहेत.साधारणतः पतंगाने अंडी दिल्यानंतर त्यामधून तीन दिवसाने अळी बाहेर पडते. २१ दिवस जीवनक्रम असलेल्या अळीच्या दोन ते तीन पिढ्या होतात.त्यानंतर अळी सुप्तावस्थेत चालली जाते. ही सुप्तावस्था साधारणतः ६ महिन्याच्या पुढे असते. पहिली पिढी फुलावर जीवनक्रम पुर्ण करते, तर नंतरच्या पिढ्या बोंडामध्ये पुर्ण करते. 

गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खालीलप्रमाणे

अंडी अवस्था - ३ ते २५ दिवस

अळी अवस्था -८ ते २१ दिवस

कोष अवस्था - ६ ते २० दिवस

पतंग अवस्था - ६ ते ७ दिवस

अळी अशावेळी हंगाम संपल्यानंतर ६ महिन्यापर्यंत सुप्तावस्थेत राहते.

गुलाबी बोंड अळीसाठी उपाययोजना

- कपाशीच्या पिकात नियमित करा सर्वेक्षण

- डोमकळ्या दिसून आल्यास तोडून आतील अळीसह नष्ट करा

- कामगंध सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात लावा

- मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे ८ ते १० कामगंध सापळे लावा

- ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी २-३ या प्रमाणात पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे.

- ५ टक्के निंबोळी अर्क अथवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशी युक्त कीटकनाशकाची ८०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी

- कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास शिफारशीत एका रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.- प्रोफेनोफॉस (५० टक्के) ४०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के) ८८ ग्रॅम प्रती एकर किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के (संयुक्त कीटकनाशक) ४०० मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे.

- कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.

- लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये

Tags