कांद्याचे भाव गडगडले, शेतकर्यांच्या डोळ्यात पाणीच आले.
सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. त्यातच पुन्हा शेतमालाला दर मिळत नसल्याचे शेतकरी अडचणीत आहे.
कांदा दरात मोठी घट : अहमदनगर जिल्ह्यातील उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्यांच्या लागवडी झाल्या आहेत. मागील महिन्यात कांदा लागवडी झालेल्या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं परिसरातील अनेक ठिकाणी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच मजूर टंचाई, विजेच्या लपंडाव, रासायनिक खते व औषधांचा वाढता खर्च अशा सर्व अडचणींवर मात करत शेतकर्यांनी आपले कांदा पीक उभा केले. पण सध्या त्याच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं कांद्यानं शेतकर्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणल्याची स्थिती आहे.
शेतकर्यांवर दुहेरी संकट: उत्पादनात घट तसेच भाव घसरले.
आधीच राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. अशातच त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यावर दुहेर संकट येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे क्षेत्र असते. मात्र, सध्या या कांद्याला दर मिळत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. उन्हाळी कांदा काढणीला सध्या वेग आला असला तरी या अपेक्षित उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकर्यांचा खर्च देखील निघणार नाही, असे चित्र दिसत आहे.
सुरुवातीच्या कांद्याला 1200 ते 1400 रुपयांचा जागेवर भाव मिळाला. आता मात्र कांद्याला सातशे ते आठशे रुपये भाव मिळत आहे. परिसरात अजूनही बराच कांदा काढणीचा बाकी आहे. एप्रिल महिन्यात सर्व शेतकर्यांचा कांदा काढून होईल असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सर्व कांदा काढून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल. त्यामुळे शेतकरी सध्या धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.
उस उत्पादक शेतकरीही मेटाकुटीस आले आहे, एप्रिल महिना सुरू होईल तरीही उसाचे बरेचसे पीक अजून शेतात उभे आहेत. शेतकर्यांना उस आणि कांदा ही नगदी पिके सोडून इतर पर्यायी पिकांचा विचार करण्याची वेळ आली आहे.