मागच्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने मागच्या 24 तासांत उसंत दिली असली तरी पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. (Maharashtra Rain Alert) राज्यात पुढचे चार दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील ही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील पाऊस कमी झाला असून केवळ काही भागांतच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती.