Type Here to Get Search Results !

जायकवाडी धरण इतके भरले, विसर्ग सुरू

जायकवाडी धरण भरले




 राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला असतांना धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये सुद्धा वाढ होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) होणारी आवक सुद्धा वाढली असल्याने यावर्षी दुसऱ्यांदा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्या धरणातून एकूण 30 हजार 485 क्युसेकने विसर्ग करण्यात येत असून, 27  हजार 155  क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडीत सकाळी 6 वाजता 94.83 टक्के पाणीसाठा होता.

जायकवाडी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे दार क्रमांक 10 ते 27 उघडण्यात आले आहेत. अठराही दरवाज्यातून 1.5 इंच वरती करून पाणी सोडले जात आहे. उघडण्यात आलेल्या अठरा दारातून 28 हजार 296 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589  क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून सद्या एकूण 30 हजार 485 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षात दोनदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहे. 

जायकवाडी धरणातून करण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग पाहता गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीत सद्या 30 हजारपेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावकऱ्यांनी नदी पात्रात उतरू नयेत असे आवाहन प्रशासनाने केला आहे. 
Tags