Type Here to Get Search Results !

कुठे आणि कसा झाला विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात...

अपघात ठिकाण व वेळ : आज दि.13/08/2022 रोजी पहाटे   05.05 वा. चे सुमारास  मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर  रसायनी पोलीस ठाणे हद्दीत प्राणांतिक अपघात घडला. अपघातातील वाहन  1) फोर्ड Endeavour  क्र.MH 01 DP 6364

अपघाताचे कारण : नमूद वेळी व तारखेस फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 चालक एकनाथ कदम हे विनायक मेटे(केज-बीड) यांना घेऊन  मुंबई बाजूकडे दुसरे लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात विनायक मेटे  हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी  तपासून मयत घोषित केले आहे. 

बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे  कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल,कामोठे  येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे  बाजूला  घेतली आहे. सदर वेळी आम्ही PSI चव्हाण तसेच  रसायनी पोलीस स्टेशन API बालवडकर व   स्टाफ तसेच IRBचे  नवनाथ गोळे  आणि स्टाफ हजर होते. सदर अपघाताची माहिती रसायनी  पोलीस स्टेशनला दिली आहे.

अपघाताची माहिती मिळाली -05.58

रवाना - 05.58

पोहोचलो - 06.05

कारवाई पूर्ण-07.10

अंतर- म.पो.केंद्र. पळस्पेपासून 06.400किमी

कसा झाला अपघात

विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. 

अपघातानंतर एक तासभर कुणाचीही मदत नाही - एकनाथ कदम

मेटे यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले. 

(सौजन्य- abpmaza )

Tags