यावर्षी राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं यंदा पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेषत सोयाबीन (soybean) आणि कापूस ( cotton) पिकाला मोठा फटका बसला आहे. आता कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह कापसच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मात्र कमी होत आहेत. याकडं लक्ष देऊन सोयाबीनला किमान 8 हजार 600 आणि कापसाला 12 हजार 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, अन्यथा 6 नोव्हेंबरला बुलडाण्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.
सोयाबीनला 8600 तर कापसाला 12 हजार 500 रुपये भाव
बुलडाण्यात तुपकर यांना पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सहा नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या पिकासाठी लागणारा उत्पादन खर्चही वाढलेला आहे. त्या तुलनेत भाव मात्र कमी होत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ द्यावा, सोयाबीनला किमान 8 हजार 600 आणि कापसाला 12 हजार 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, तसेच पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ द्यावे आणि सोयाबीनची आयात थांबवावी अशी विविध मागण्या तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केल्या आहेत. याकडं सरकारने 5 नोव्हेंबर पर्यंत लक्ष न दिल्यास 6 नोव्हेंबरला बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती रविकांत तुपकर यांनी दिली आहे.