Goat bank Of Karkheda
देशमुख यांना अर्थशास्त्रातल्या 'कंपाऊंडींग'च्या सुत्रातून त्यांना ही संकल्पना सुचली. बकरी पालन भरपूर नफा देणारा व्यवसाय... म्हणून त्यांनी बकरी बँक सुरू करण्याचं ठरवलं. यासाठी सर्वात आधी त्यांनी 40 लाखांच्या 340 बकऱ्या खरेदी केल्या. त्यानंतर गरजू शेतकऱ्यांना 1100 रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन एक-एक बकरी कर्ज म्हणून दिलीय. हे देतांना बकरीच्या 40 महिन्यातल्या चार वेतातील प्रत्येकी एक अशी चार पिल्ल बँकेला परत करण्याचा करार केला गेला. बँकेला मिळालेल्या ११०० रूपयांत बँकेनं बकरी मालकाला पशुवैद्यक आणि पशुसखीच्या माध्यमातून आरोग्य, खाद्य आणि लसीकरण विषयक सल्ल्याची व्यवस्था करण्यात येते. अकराशे रूपयांत बकरीचा विमासुद्धा काढला जातो. त्यामूळे बकरीला काही झालं तर लाभार्थ्याला त्याच्या नुकसान भरपाईची हमी राहते.
अशी चालते गोट बँक :
- 1100 रूपयांच्या करारात लाभार्थ्याला मिळते बकरी.
- ग्रामप्रेरकाच्या माध्यमातून होतो करार.
- 40 महिन्यांत चार बकऱ्या बँकेला परत करणे बंधनकारक.
- बँक लसीकरण, खाद्य आणि रोग प्रतिबंधक सल्ला पुरविते.
- बँकेची नवी शाखा उघडण्यासाठी कमीत कमी 100 बकऱ्यांची आवश्यकता.
- शाखेसाठी अडीच एकरांत बकरीच्या पशुखाद्यासाठी जंगली वनस्पतींची लागवड आवश्यक.
- बँकेत बकरीच्या स्वरूपातच कर्ज, व्याज, परतफेड, डिपॉझिटची व्यवस्था.
- बकरी सात ते आठ महिन्यांची झाल्यावर 35 ते 40 किलोची झाल्यावर विक्रीतून मिळू शकतो नफा.
बँक पहिल्या दोन वर्षांतच नफ्यात झाली 'करोडपती' :
नरेश देशमुखांनी व्यवसायाला सुरूवात केल्यानंतर सर्वात आधी त्यांनी 40 लाखांच्या 340 बकऱ्या खरेदी केल्या. त्यानंतर गरजू आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना 1100 रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन एक-एक बकरी देऊन टाकली. नंतर 40 महिन्यानंतर बकरीची चार पिल्ले आणून देण्यास सांगितले आणि व्यवसायाला सुरुवात झाली. आतापर्यंत बँकेनं लाभार्थ्यांना दिलेल्या बकरींपैकी 800 पिल्ले शेतकऱ्यांनी आणून दिलीय. त्यानंतर बकऱ्यांची पिल्ले एका कॉन्ट्रॅक्टरला विकल्यानंतर बँकेला तब्बल 1 कोटींचा फायदा झालाय.
गोट बँकेची 'शाखा' स्थापन करण्यासाठी असं करता येईल.
एखाद्या बचत गटाला किंवा बचत गटांच्या समुहाला (सीएमआरसी)ला गोट बँकेची शाखा आपल्या गावात स्थापना करायची असल्यास 13 लाखांचं भांडवल लागतं. यात आता माविमचं अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचंही 10 लाखांचं अनुदान मिळतं. सोबतच बकऱ्या ठेवायला 'शेड' आणि अडीच एकर शेतीत बकऱ्यांसाठी आवश्यक 20 प्रकारचा पशुखाद्य असणाऱ्या रानटी पाला आणि गवताची लागवड करणे आवश्यक आहे. या पशुखाद्याच्या विक्रीतून शाखेला अधिकचा नफा कमावणे शक्य आहे. शाखा सुरू करण्यासाठी कमीत कमी 100 बकऱ्यांचं भांडवलापासून गट सुरूवात करू शकतो. पुर्ण क्षमतेनं 800 बकऱ्यांपर्यंत नफ्यात असलेली शाखा सहा वर्षांत साडेतीन कोटींपर्यंत कमाई करू शकते असं गणित देशमुख पुराव्यांसह मांडतात. यातील खर्च वजा जाता एक शाखा सहा वर्षांत दोन ते तीन कोटींपर्यंत नफा कमावला जावू शकतो असं ते सांगतात.
'बँक ऑफ कारखेडा'ला मिळालं 'पेटंट' :
नरेश देशमुख यांचा 'गोट बँक ऑफ कारखेडा'चा प्रयोग अतिशय 'अफलातून' आणि 'क्रांतीकारी' असाच. त्यामुळे त्यांनी या प्रयोगाचं पेटंट करायचा निर्णय घेतला. अन त्यांच्या या प्रयोगाला अलिकडेच पेटंटही मिळालं आहे. आता बँकेचा कारभार चालविण्यासाठी 'कारखेडा कृषी उत्पादक कंपनी' स्थापन करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचे 521 भागधारक आहेत.